Wednesday, May 26, 2021

बुद्ध पौर्णिमा महत्व


 जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणा-या तथागत गौतम बुद्धांची वैशाख बुद्ध पौर्णिमा जगभरात साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे, ती म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते. बुद्ध पौर्णिमा ही केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांत साजरी केली जातो. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असे म्हणतात. हा वैशाखचा अपभ्रंश आहे.

बुद्ध पौर्णिमेला स्रू्य मेष राशीत, तर चंद्र तूळ राशीत प्रवेश करतो. या दिवशी गंगेत केलेले स्नान पवित्र मानले जाते. गंगेत स्नान केल्याने गेल्या जन्मातील कुकर्मातून मुक्ती मिळते, असा समज आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळे रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.

आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्धांना जगातील महान महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठय़ा प्रमाणावर संख्या असणा-या चीन, जपान, व्हिएतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात. जगभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे. याच पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात पाच अत्यंत महत्त्वाच्या घटना घडल्या.

१. राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म
२. राजकन्या यशोधरेचा जन्म
३. राजकुमार सिद्धार्थचा मंगलपरिणय (विवाह)
४. ज्ञानप्राप्ती
५. महापरिनिर्वाण

भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होतो. या तिथीला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते. गौतम बुद्ध ज्या-ज्या ठिकाणी गेले, ती सर्व ठिकाणे बौद्ध तीर्थ बनले. बुद्धांनी काश्मीरपासून ते अफगाणिस्तानपर्यंत यात्रा केली होती. बौद्धकाळात अफगाणिस्तान बामियान क्षेत्र बौद्ध धर्माची राजधानी होती. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रारंभिक काळात बौद्ध धर्माचे गड होते. बुद्ध पौर्णिमे निमित्ताने आम्ही तुम्हाला बुद्धाच्या काही ठिकाणांची माहिती देत आहोत.

लुंबिनी

गौतम बुद्धांचा जन्म इ.स. ५६३ पूर्वी नेपाळच्या लुम्बिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाला. उत्तर प्रदेशातील ककराहा नामक गावापासून १४ किलोमीटरवर नेपाळ-भारताच्या सीमेवर असलेल्या रुमीनोदेई नावाचे गाव लुम्बिनी असून, हे गौतम बुद्धांच्या जन्मस्थान रूपात प्रसिद्ध आहे. कपिलवस्तूमध्ये एक स्तूप होते, जेथे भगवान बुद्धांच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. बुद्धांची आई कपिलवस्तूची महाराणी मायादेवी आपल्या माहेरी कोलीय गणराज्याची राजधानी देवदह येथे निघाल्या होत्या, तेव्हा रस्त्यामध्ये त्यांनी लुम्बिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली बुद्धांना जन्म दिला होता.

बोधगया

हे स्थान बिहारचे प्रमुख हिंदू पितृ तीर्थ ‘गया’ येथे स्थित आहे. गया शहराचे नाव गयासूर नावावरून ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी एका झाडाखाली गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले होते.

सारनाथ

हे ठिकाण उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ आहे. येथे बुद्धांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर पहिला उपदेश दिला होता. येथूनच त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन प्रारंभ केले होते.

कुशीनगर

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात स्थित या ठिकाणी महात्मा गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले होते. गोरखपूर जिल्ह्यातील कासिया नामक ठिकाणी प्राचीन कुशीनगर आहे.

श्रावस्तीचे स्तूप

पूर्वोत्तर रेल्वेच्या गोरखपूर-गोंडा मार्गावर असलेल्या बलरामपूर स्टेशनपासून १२ किलोमीटरवर पश्चिमेला सहेठ-महेठ नावाची प्राचीन श्रावस्ती आहे. ही कौशल देशाची राजधानी होती. भगवान श्रीरामाचा मुलगा लवने श्रावस्तीला आपली राजधानी बनवली होती. श्रावस्ती बौद्ध आणि जैन दोन्हीचे तीर्थ आहे.

आपल्या प्रत्येकामध्ये सिद्धार्थच्या रूपाने छोटा बुद्ध आहे. बुद्ध हे बुद्ध होण्याआधी सिद्धार्थ होते. ते भटकत होते, हरवले देखील. ते म्हणायचे, ‘जग हे दु:खाने भरलेले आहे आणि मला दु:खापासून मुक्त व्हायचे आहे.’ सर्वकाही दु:ख आहे, हे त्यांनी जाणले होते; परंतु त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता. बुद्धांनी अतोनात प्रयत्न केले, जमीन आसमान एक केले, सारे दरवाजे ठोठावले. विविध प्रक्रिया मागून प्रक्रिया करून पाहिल्या. सारे निर्थक झाले. कारण, हे सर्व करत असताना त्यांचे मन सतत बाहेर धावायचे. मग ते दमले भागले-सारे सोडून दिले आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले.

विविध प्रयत्न करून जेव्हा ते थकले आणि मग त्यांनी विचार केला की, ठीक आहे, आता मी सर्व काही सोडून देत आहे. मला जरा विश्राम करू द्या, त्यांनी सर्व काही सोडून दिले आणि त्यांचे मन अंतर्मुख झाले आणि ते ‘बुद्ध’ बनले.

दुर्दैवाने बुद्धांना त्याकाळी गुरू लाभले नाहीत. त्यांना बसताक्षणी समाधी प्राप्त व्हायची. पण, बुद्धांना ध्यान आणि समाधी प्राप्त करणे सहज शक्य नव्हते. त्यांच्यासाठी ते कठीण होते. त्यांना कोणी सांगितले उपवास करा, त्यांनी उपवास केला. ते राजघराण्यातील असल्यामुळे ते समर्पण, भक्ती आणि त्यागाबद्धल काहीही जाणत नव्हते. काहीतरी करावे लागते, काहीतरी केले पाहिजे, एवढेच त्यांना ऐकून माहीत होते आणि जे ऐकले ते करत गेले. जेवढे करणे तेवढा कर्ताभाव, तेवढा अहंकार. या सर्वामुळे बराच कालावधी ते धावतच राहिले. शेवटी त्यांनी सर्व सोडून दिले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले.

Friday, May 14, 2021

छत्रपती संभाजी महाराज


 लहानपण


  •               संभाजीराजांचा जन्म मे १४इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळीलकापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आईजिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
  • अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.


  तारूण्य आणि राजकारण्यांशी मतभेद

  •                    १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
  • शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. महाराजांचे अमात्य संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी, 'आबासाहेब, हे बघा आपले लबाड अमात्य आले' असे उद्गार काढल्याचे इतिहासात नमूद केले आहे. या कारणांमुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.
  • सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. अफझलखानशाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढय शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. आपल्याला दक्षिण हिन्दुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.
  • शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून एक वर्ष करवसुली न करायचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकर्‍यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.




   छत्रपती

  •                 १६ जानेवारी१६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले.
  • औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. मराठयांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळीलरामशेज किल्ल्याचा लढा! औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठयांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरूद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. यांपैकी कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे बिमोड करणे संभाजीराजांना शक्य झाले नाही. पण त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरूद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
  • १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-- गणोजी शिर्केमहादजी निंबाळकर आणि हरजीराजे महाडिक काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले.


   संभाजी महाराज-एक उपेक्षित लढवय्या

  •                         पण कुणी हा विचार करतो का की , ज्या शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पकडल्यावर फक्त कैद करून ठेवले , तिकडे संभाजी महाराजांचे इतके हाल करायचे कारण काय ? असे काय घडले होते , की औरंगजेब इतका दुखावला होता ? महाराजांनी औरंगजेबाची सुरत दोन वेळा लुटली , ( ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाने केला नसेल इतका राग आजही काही गुजराती माणसे महाराजांचा करतात. त्याच्या मामाची म्हणजे शाहिस्तेखानाची बोटे कापली. पण त्याचा बदला म्हणून देखील औरंगजेब महाराजांचे बोट वाकडे करू शकला नाही , मग नेमके संभाजी महाराजांनी असे काय केले होते की , त्यांच्याबद्दल औरंगजेबाच्या मनात इतका राग होता ?
  • शिवाजी महाराज हे सरदार पुत्र होते तर संभाजी महाराज हे युवराज होते , त्यामुळे त्यांच्या वृत्तीत फरक हा असणारच. दिसायला ते राजबिंडे होते. उंची ६ फुट ३ इंच होती. धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते. त्यांच्या हजरजबाबीपणाचा एक किस्सा म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग सोबत तह केला तेव्हा , तहाची पूर्तता होत नाही तोवर मिर्झाराज्यांनी शंभूबाळाला वज्रगडावर ओलीस ठेवले होते. तहाची पूर्तता झाल्यावर जेव्हा शंभूराजे परत निघाले तेव्हा दिलेलखानाने त्यांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि विचारले कि , ' इतका मोठा हत्ती तुम्ही दक्खनला कसा काय घेवून जाणार ?' तेव्हा शंभूराजे म्हणाले की , ' हत्ती तर आम्ही कसा ही घेऊन जाऊ , पण आमच्या आबासाहेबांनी जे किल्ले दिले आहेत ते परत कसे नेता येतील ह्याचा आम्ही विचार करतो आहोत .' दिलेलखान तर सोडा पण हे असले फटके संभाजी महाराजांनी वेळोवेळी औरंजेबालासुद्धा लगावलेले आहेत.
  • औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता. आणि त्या दरम्यान त्यांनी अकबराची बहिण झीनत हिला एक पत्र लिहिले होते , जे औरंगजेबाच्या माणसांच्या हाती लागले आणि ते भर दरबारात औरंगजेबाला वाचून दाखवले गेले होते. ते पत्र असे होते , ' तुमचे बंधू शहजादे अकबर यांनी हिंदुस्तान सोडण्यापूर्वी आम्हाला तुमच्या बद्दल सांगितलं . तुम्ही त्यांना पत्र पाठवलं होतं . त्याचा जबाब त्यांनी तुम्हाला परत पाठवला नव्हता . तो निरोप त्यांनी जाताना आमच्याकडे देवून ठेवला आहे तो असा : बादशहा सलामत हे नुसते मुसलमानांचे बादशहा नाहीत . हिंदुस्तान रयत वेगवेगळ्या धर्माची आहे . त्या साऱ्यांचेच हजरत बादशहा आहेत . जी गोष्ट मनात ठेवून ते या दक्खनच्या पठारावर आले ती आता साध्य झाली आहे . त्यात समाधान मानून त्यांनी आता हिंदुस्तानांत परत कूच करावं . एकदा त्यांच्या तावडीतून आम्ही आणि आमचे तीर्थरूप सुखरूप सुटून आलो आहोत . पण बादशहा अशीच आपली जिद्द चालवणार असतील तर आमच्या पकडीतून मात्र ते सुटून परत हिंदुस्तानात जाणार नाहीत . त्यांची तशीच इच्छा असेल तर त्यांनी आपल्या कबरीसाठी या दक्खनमध्ये लवकरच जागा शोधलेली बरी .


   दगाफटका

  •                                   १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातसंगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.

 
  शारीरिक छळ व मृत्यू

  •                           त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून धिंड अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.
  • बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते. गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते. त्या खोड्याला घुंगरे बांधलेली होती अन् त्यावर छोटी छोटी निशाणे चितारलेली होती.
  • अशी ती धिंड मोगली फौजेमधून काढलेली होती. मोगलांमध्ये ईदपेक्षाही उत्साहाचे वातावरण होते. दुतर्फा फौजेतील सैनीक महाराजांवर व कवी कलशांवर दगडे भिरकावीत होते. त्यांना भाल्याने टोचीत होते. त्यांचे नगारे वाजत होते, कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे फडकत होते. रायगडचा राजा, महाराजांचा व जीजाआऊचा शंभूबाळ आज रांडा पोरांच्या विटंबनेचा विषय झालेला होता.
  • पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हालवला. इथे तुळापूरच्या संगमावर त्याला हिंदू राजास हलाल करावयाचे होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून रवी जशी फिरवावी, तशा त्या तप्त - लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलशाचेही डोळे काढण्यात आले.
  • बलिष्ठ शरीर यष्टीचा एक पठाण कविराजांच्या छातीवर बसला. दोघांनी त्यांचे पाय उसाचे कांडे पिळगटावे तसे मागे खेचले. दोघांनी आपल्या राकट हातांनी कविराजांची मुंडी धरली. त्या पठाणाने कविराजांच्या जबड्यात हात घातला. कविराजांचे मुख रक्ताने भरून गेले. त्या धटींगणाने कविराजांची जीभ हाताने बाहेर खसकन खेचली. एकाने ती वीतभर लांब बाहेर आलेली जीभ कट्यारीने खचकन छाटली. कविराजांच्या तोंडातून रक्ताचा डोंब उबळला. संभाजी महाराजांचीही जीव्हा अशीच छाटली गेली. पहाणार्‍यांचेही डोळे पांढरे पडले. असूरी आनंदाने आवघी छावणी गर्जत होती.
  • कवी कलशांवर होणारे अत्याचार ही जणू संभाजी महाराजांवर होणार्‍या अत्याचारांची रंगीत तालीमच असायची. संध्याकाळ झाली. शंभू महादेव खांबास घट्ट बांधून ठेवलेले होते. स्वाभीमानाने तळपत झळकणार्‍या तेजस्वी योग्यासारखे. ज्यांच्या तेजाने शेशही डळमळून जावा अशा तेजस्वी श्रीकृष्णासारखे. अविचल. अभेद्य ! आभाळात अभिमानाने मस्तक उंचावून बाणेदारपणे उभे असलेल्या रायगडाच्या टकमक टोकासारखे.
  • दोन दैत्य पुढे सरसावले. एकाने पाठीच्या वरच्या मणक्यापासून आणि दुसर्‍याने समोरून गळ्यापासून शंभूराजांच्या अंगात वाघनख्या घुसवल्या. त्या राक्षसांना जोर चढावा म्हणून कुराणातील आयते वाचले जात होते. रण वाद्यांचा दणदणाट होत होता. "दीन दीन" "अल्लाहो अकबर" च्या घोषात राजांची त्वचा डाळिंबाच्या टरफला सारखी सोलली जात होती. जास्वंदीसारखा लाल बुंद देह यातनांनी तळमळत होता. रक्ता मासाच्या चिंध्या होत होत्या. संपूर्ण देहाची चाळणी झाल्यावर मग फरशा व खांडे पेलत दोन गाझी (धर्मेवीर) पुढे आले. त्या दोघांचेही हात पाय असे अवयव एक एक करून तोडून टाकले. एकाने खांड्याचे धारधार पाते संभाजी राजांच्या मानेत घुसवले. व हळू हळू कुराणातील आज्ञेप्रमाणे 'हलाल' करीत शिर चिरत धडावेगळे केले !!!
  • मार्च १११६८९ रोजी संभाजीराजांची शिरच्छेद करून भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

Wednesday, May 12, 2021

12 मे जागतिक परिचारिका दिन



           संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे हाह:कार माजला आहे. या व्हायरसविरद्ध कोरोना योद्धे नेटाने लढा देत आहेत. जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स रुग्णांची सेवा करत आहेत. जगभरात आज (12 मे) आंतरराष्ट्रीय नर्स दिन साजरा केला जात आहे. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. आज त्यांची जयंती आहे.



12 मे 1820 रोजी इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात फ्लोरेन्स यांचा जन्म झाला. सुखवस्तू कुटुंबातील असलेल्या फ्लोरेन्स यांचं पालनपोषण इंग्लंडमध्ये झालं. त्यांना वयाच्या 16 वर्षी जाणीव झाली की आपला जन्म सेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहासात निपुण असलेल्या फ्लोरेन्स यांना नर्स बनायचं होतं. रुग्ण, गरीब आणि पीडितांची त्यांना मदत करायची होती. परंतु वडील त्यांच्या इच्छेच्या विरोधात होते. कारण त्यावेळी नर्स पेशाकडे सन्मानाने पाहिलं जात नसे. रुग्णालयंही अस्वच्छ असायची. फ्लोरेन्स यांनी आपली जिद्द कायम ठेवली आणि 1851 मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. 1853 मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं.


1854 मध्ये क्रीमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटीश सैनिकांना रशियातील क्रीमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत होतं. युद्धात सैनिक जखमी झाल्याचं आणि मृत पावल्याचं वृत्त समजताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन तिथे पोहोचल्या. परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी नसल्याने आजार वेगाने वाढला आणि प्रादुर्भावामुळे सैनिकांचा मृत्यू झाला. फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासोबतच रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे, जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं. यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय सुधारणा झाली.


युद्धकाळात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र एकत्र केले. सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला त्या पत्र पाठवत असत. रात्रीच्या वेळी हातात लालटेन घेऊन त्या रुग्णांची विचारपूस करत असत, त्यांची देखभाल करायच्या. यामुळे सैनिक प्रेम आणि आदराने त्यांना 'लेडी विद लॅम्प' म्हणायचे. 1856 मध्ये युद्धानंतर परतल्यानंतर याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.



13 ऑगस्ट, 1919 रोजी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचं निधन झालं. फ्लोरेन्स यांच्या नायटिन्गेल यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिवस हा परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं.



जागतिक परिचारिका दिवस 2020 ची थीम

यंदा नर्स दिवसाची थीम 'जागतिक आरोग्यासाठी नर्सिंग' हा आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय नर्स दिवस साजरा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अहोरात्र झटणाऱ्यांना परिचारिकांच्या नावे 2020 हे वर्ष असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने आधीच जाहीर केलं होतं.

Tuesday, May 11, 2021

११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस


 11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची 'पोखरण अणु चाचणी' आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.


भारताचं आव्हान

   

अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.


जगाला धक्का

   

11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम कसे केले हे पाहून जगाला धक्का बसला.



अमेरिकेला चकवा

   

भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती. १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.


हंसा - ३

   

अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली.



   

या व्यतिरिक्त, भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं. हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.

Sunday, May 9, 2021

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपरिचय


 कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खोप गाजले होते.कुंपणाच्या काट्या तोडणार्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.त्यंच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.

इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थान चे राजे राजर्षी शाहू महाराज होते.भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पूणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग' ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.

एकदा कर्मवीर् सुट्टीत इस्लामपूरला आले.त्यावेळी कार्मावीरांचे आई वडील तिथे राहत होते.रिकाम्या वेळेतकर्मवीर शाळेकडे गेले.पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता.सर्व मुले वर्गात बसलेली होती.आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता.गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले.ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्वताजाव्ल बसूनच जेऊ घातले.नंतर कोल्हापूर ला नेऊन 'मिस क्लार्क होस्टेल'लादाखल केले.तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या 'मूकनायक'वर्तमान पत्राचा तोकाही काल तो संपादक होता.इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आई ने त्यांना फुंकनीने मारले.फुंकनीचा मार वाया गेला नाही.पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.अण्णा हायस्कूला असताना होते. पण त्यांन रस नव्हता.[३]

शिक्षण संस्था -संपादन करा

पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळेनानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारेघेऊन जाण्यासाठी त्यांनी रयतशिक्षण संस्थेची स्थापना केली.मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका' हि योजना सुरु केली.महाराष्ट्रात ४ जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक,२७ प्राथमिक,४३८माध्यमिक,८ आश्रमशाळा,८ अध्यापक विद्यालय,२ आय.ट.आय,व ४१ महाविध्यालायांचा समावेश आहे.अशा या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टो १९१९ रोजी केली.

.

दिनांक ऑक्टोबर ४इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -

  1. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
  2. मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
  3. निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
  4. अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
  5. संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
  6. सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
  7. बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.

त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[४] रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक, २७ प्राथमिक, ४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय, २ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.

ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.

Friday, May 7, 2021

डॉ. रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती


 रवींद्रनाथ हे एक थोर साहित्यिक, कवी, नाटककार, संगीतकार व चित्रकार होते. त्यांचा साहित्य क्षेत्रात नोबेल या उच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला होता. बंगाली साहित्यावर विशेष प्रभुत्व ठेवणारे रवींद्रनाथ यांच्या “गीतांजली” व “जन – गण – मन” या रचना प्रसिद्ध आहेत. तसेच शांतिनिकेतनची उभारणी करणारे, सृजन साहित्यिक म्हणून ओळख असणारे आणि भारतीय आणि बांगलादेशी राष्ट्रगीताचे रचेते म्हणून देखील रवींद्रनाथ प्रसिद्ध आहेत.


रवींद्रनाथ टागोर संक्षिप्त जीवनपट –

कोलकात्याच्या जोरशंका ठा़कूरबाडी येथे पिराली ब्राह्मण कुटुंबात रवींद्रनाथ टागोर यांचा ७ मे १८६१ रोजी जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी होते. त्या दोघांच्या १४ अपत्यांपैकी रवींद्रनाथ हे १३ वे अपत्य होते. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहली. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत कलकत्ता सोडले व भारतभ्रमण सुरू केले. भारतातील अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. याच काळात त्यांनी खगोलशास्त्र, विज्ञान, संस्कृत, इतिहास या विषयातले अनेक ग्रंथ, पुस्तके वाचली. अनेक महान व्यक्तींची आत्मचरित्रे अभ्यासली. इतका दांडगा व्यासंग व वाचन असल्याने वयाच्या फक्त १६ व्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केले. त्यांनी रचलेल्या प्राथमिक कविता या सतराव्या शतकातील भानूसिंह नामक वैष्णव कवीच्या आहेत असे प्रथम सांगितले परंतु नंतर त्या स्वतःच रचलेल्या आहेत असे मान्य केले. या कवितांमुळे ते प्रसिद्ध झाले होते. नंतर त्यांनी “संध्या-संगीत”, बंगाली भाषेत “भिकारिणी” ही लघुकथा तर सुप्रसिद्ध कविता “निर्झरेर स्वप्नभंग” इत्यादी प्रसिध्द रचना केल्या.


पुढे बॅरिस्टर होण्यासाठी लंडन येथे युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला. परंतु पदवी न मिळवताच ते परतले. १८८३ मध्ये त्यांनी मृणालिनी देवी यांच्याशी विवाह केला. त्यांना एकूण पाच अपत्ये झाली. त्यापैकी दोघांचा बालमृत्यू झाला. १८९० पासून त्यांनी टागोर घराण्याची मालमत्ता सियाल्दा येथे सांभाळण्यास

सुरुवात केली. नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची सुद्धा साथ मिळाली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या लिखाणाला आता सृजनता लाभली होती. गल्प – गुच्छ ( म्हणजेच मराठीत कथा – गुच्छ ) हे ८४ कथा असलेले ३ खंडी पुस्तक प्रकाशित केले. बंगालची संस्कृती आणि ग्रामीण जीवन यात सुरेखरित्या रेखाटले आहे. जीवनातील विरोधाभास या पुस्तकातून झळकतो.



 

१९०१ साली ते सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. त्यांच्या सृजनशील आणि कलात्मक व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला शांतिनिकेतन येथे राबवलेल्या उपक्रमातून कळून येते. पारंपारिक शिक्षणाला असलेल्या विरोधात्मक विचारातून शांतिनिकेतन येथे एका आश्रमाची स्थापना करून प्रार्थना गृह, प्रयोगशील शाळा व ग्रंथालयाची निर्मिती केली. याच काळात त्यांच्या कविता, त्यांचे लेखन रसिकांचे लक्ष्य वेधून घेत होते.” नैवेद्य ” (१९०१) व ” खेया “(१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या.


” गितांजली ” या महान रचनेसाठी १९१३ मध्ये त्यांना नोबेल हा जागतिक कीर्तीचा सन्मान स्वीडिश अकॅडमी तर्फे जाहीर झाला. त्याचे भाषांतर स्वतः टागोर यांनीच केले होते. पुढे १९१५ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली परंतु जालियनवाला हत्याकांड झाल्यानंतर त्याचा निषेध म्हणून त्यांनी सर ही पदवी सरकारला परत केली.


१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे ” श्री – निकेतन ” नामक ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. विविध देशांतील विद्वान लोक, अधिकारी या संस्थेत आणि उपक्रमात सामील करून घेतले. शिक्षणातून आणि ज्ञानप्राप्तीमुळे ग्रामीण भाग सुधारू शकतो असा उद्देश या संस्था निर्मितीमागे होता. १९३० पासून त्यांनी जातीयतेविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या लेखनाने, नाटकाने जनजागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.


अखेरच्या काही वर्षात ते खूपच लोकप्रिय झाले होते. त्यांचा सामाजिक, राजकीय दृष्टिकोन विचारात घेतला जाऊ लागला होता. त्यांनी बंगाल आणि कोलकाता येथील भयावह दारिद्र्य आणि सामाजिक असमतोल यांबद्दल चिंता व्यक्त केली. पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) असे स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. चंडालिका (१९३८),चित्रांगदा, श्यामा (१९३९) यासारख्या नृत्य-नाटिका सादर केल्या व त्यावर विविध प्रयोग देखील केले. याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच(१९३४), आणि चार अध्याय (१९३४) इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या. विज्ञानात विशेष रुची ठेवत विश्वपरीचय नावाचा निबंधसंग्रह त्यांनी निर्मिला. आयुष्यात शेवटी शेवटी त्यांनी निसर्गवाद, खगोलशास्त्र, विज्ञान, अध्यात्म अशा विविध छटा असलेल्या कविता लिहल्या. शेवटची चार वर्षे त्यांनी आजारपणात काढली. त्यात ते बराच काळ कोमात होते. त्यांच्या शेवटच्या काही रचना मृत्यूचे गूढ तत्वज्ञान सांगतात. ७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचा कोलकात्यातील जोरशंका ठाकूरबाडी येथे मृत्यु झाला.

Thursday, May 6, 2021

राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयीं माहिती




*छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांना ९९ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...*

                      🌹🙏🙏🙏🌹

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक सलोख्याची देशाला आज नितांत गरज.


                                ---श्रीमंत कोकाटे


                  छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादिवरती दत्तक म्हणून आले. 1884 ते 1894 या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्षण पूर्ण केले. 1894 साली ते राजगादीवर विराजमान झाले.


               त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले, जणू काही या छत्रपतीच्या अंतःकरणामध्ये बुद्ध वास करत होता. आपल्या राज्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. राज्यारोहणामुळे शाहू महाराजांचा सत्कार पुण्यातील सार्वजनिक सभेने आयोजित केला होता, त्यादरम्यानच पुण्यात हिंदू-मुस्लिम दंगल झालेली होती आणि या दंगलीला टिळकाची मदत होती, टिळक हे वयाने शाहू महाराजांपेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. सत्कार प्रसंगी शाहू महाराज म्हणाले "हिंदू-मुस्लिमांनी एकोप्याने राहावे, भांडण करू नये" शाहू महाराजांची वयाच्या विसाव्या वर्षीची प्रगल्भता ही त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आहे.टिळक दंगल घडविण्याच्या बाजूचे तर शाहू महाराज शांतता प्रस्थापित करणारे होते.


                    शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली.


              पुणे येथील श्री शिवाजी मराठा सोसायटी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, नाशिक येथील उदाजी मराठा शिक्षण संस्था, नागपूर येथील शिक्षण संस्था, चेन्नई येथील शिक्षण संस्था अशा अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात शाहू महाराजांचा पुढाकार होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण शाहू महाराजांच्या राजवाड्यावर राहून झाले. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.


               शाहू महाराजानी 1917 साली विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला, 1919 साली आंतरजातीय विवाहाचा कायदा केला, बाजारपेठ स्थापन केली. जयसिंगपूर शहराची स्थापना केली. भारतातील सर्वाधिक जलसाठ्याचे राधानगरी हे पहिले धरण भोगावती नदीवर 1908 साली बांधले. छत्रपती शिवाजी राजांचा जगातील पहिला अश्वारूढ पुतळा 1921 साली  पुणे या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते उभारला. पहिले शिवचरित्र लिहिणाऱ्या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.


                    1899 साली वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या पुरोहिताची त्यांनी हकालपट्टी केली. बहुजन पुरोहित तयार करणारी शिवाजी वैदिक शाळा त्यांनी सुरू केली. डोणे नावाचे धनगर विद्वान  त्या शाळेचे  प्राचार्य होते. भास्करराव जाधव यांनी घरचा पुरोहित नावाचे पुस्तक लिहिले. बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा धर्म एक नाही हे त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना करून सिद्ध केले. स्वतंत्र धर्मपीठावर त्यांनी सदाशिव लक्ष्मणराव पाटील बेनाडीकर या विद्वानाची नियुक्ती केली. 


                शाहू महाराजांनी आपल्या राज्यात कधी भेदाभेद केला नाही. याउलट उपेक्षित, वंचित, भूमिहीन, अस्पृश्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी जातींना त्यांचा डावललेला हक्क अधिकार मिळावा, यासाठी 1902 साली आरक्षणाची सुरुवात केली. भारतात आरक्षणाचा पाया घालणारा राजा म्हणजे शाहू महाराज होय. 


                    आपल्या राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांनी आपले राजेपद पणाला लावले. ज्या जातींना गुन्हेगार ठरवण्यात आलेले होते, अशा जातीवरचे निर्बंध राजांनी उठवले. त्यांना नियमित हजेरीतुन मुक्त केले. त्यांना आपल्या राज्याच्या संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावरती नेमले. अस्पृश्यता नष्ट व्हावी, यासाठी ते अस्पृश्याच्या घरी जेवले. अस्पृश्यांना आपल्या राजवाड्यावर स्नेहभोजन ठेवले. अन्यायग्रस्त गंगाराम कांबळेला न्याय देऊन त्याला हॉटेल टाकून दिले. त्या हॉटेलला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी स्वतः शाहू महाराज आपल्या सहकाऱ्यांना घेऊन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जात असत. महार, मांग, चांभार इत्यादी पैलवानाबरोबर देशभरातून आलेल्या पैलवानांनी कुस्ती खेळावी म्हणून त्यांना जाट, सरदार, पंडित अशी नावे दिली. 


                जातिभेद नष्ट व्हावा यासाठी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली. याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून केली त्यांनी आपली बहीण चंद्रप्रभादेवी यांचा विवाह इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्या बरोबर लावून दिला, असे सुमारे 25 आंतरजातीय विवाह घडवून आणले, यातून त्यांनी मराठा- धनगर आणि इतर जाती एकमेकांचे विरोधक नसून नातेवाईक आहेत, हे सिद्ध केले. म्हणजे शाहू महाराज हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते.


             छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था मोडणारी व समता प्रस्थापित करणारी परंपरा आहे, छत्रपतींची परंपरा जातीव्यवस्था पाळणारी विषमतावादी परंपरा नाही,छत्रपतींची परंपरा प्रगल्भ परंपरा आहे, ती संकुचित नाही.


            शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली. मूकनायक या नियतकालिकासाठी मदत केली. शाहू महाराज म्हणाले "बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे नेते आहेत आणि तेच खरे लोकमान्य आहेत". शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या मुंबई येथील घरी जाऊन त्यांचा सत्कार केला, याप्रसंगी शाहू महाराज म्हणाले "रमाबाई माझी धाकटी बहीण आहे, तुम्ही लंडनवरून परत येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो"  


            माणगाव आणि नागपूर येथील परिषदेत जाऊन शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खंबीर पाठिंबा दिला. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्प वरती स्नेहभोजन दिले आणि मानाचा जरीपटका देऊन सत्कार केला. याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "छत्रपतींनी मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला, त्याचा मी सदैव सन्मान राखीन." 


            शाहू महाराजांच्या मुला-मुलींच्या लग्नात करवले म्हणून भटक्या विमुक्त, दलित जातीतील समवयस्क मुला-मुलींना सोबत घेतले होते, जेणेकरून विषमता नष्ट व्हावी व सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, हे शाहू महाराजांचे धोरण होते.


               शाहू महाराजांनी आपल्या राज्यात हिंदू-मुस्लिम हा भेद केला नाही. मुस्लिमांच्या शिक्षणासाठी त्यांनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. आपल्या राज्यातील गरिबातल्या गरीब मुस्लिमांना कुराण मराठी भाषेत वाचता यावे, यासाठी अरबी भाषेतील कुराणाचे मराठी भाषांतर करण्यासाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली. शंभर वर्षांपूर्वीची ही रक्कम खूप मोठी रक्कम आहे. शाहू महाराजांनी पाटगावच्या मौनी बाबाच्या मठाचा उत्पन्नातील रक्कम तेथील मुस्लिमांच्या मशिदीच्या बांधकामासाठी दिली, तर रुकडीतील पिराच्या देवस्थानाच्या उत्पन्नातील रक्कम तेथील अंबाबाई मंदिराच्या बांधकामासाठी व दिवाबत्तीसाठी दिली, इतका सामाजिक सलोखा शाहू महाराजांच्या राज्यात होता


              शाहू महाराजांनी शाहीर लहरी हैदर, चित्रकार आबालाल रहमान, गानमहर्षी अल्लादिया खाँसाहेब, मल्लविशारद बालेखान वस्ताद यांना सर्वतोपरी मदत केली. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. 


                शाहू महाराजानी आपल्या राज्यात सर्वांचा विकास आणि शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध उघडपणे संघर्ष केला, परंतु आज सामाजिक वातावरण बिघडवले आहे, जातीजातीत आणि धर्माधर्मात विष पेरले जात आहे. भिडे नावाच्या पातळयंत्री व्यक्तीने शिवशाहूच्या राज्यात चुकीचा इतिहास सांगून अराजकता माजवलेली आहे. दलित आणि मुस्लिम हे मराठयांचे शत्रू आहेत, असे वातावरण त्यांनी निर्माण केलेले आहे 


              सर्व समाज बांधवांना विनंती आहे की मराठा-दलित, हिंदू-मुस्लिम एकमेकांचे शत्रू नाहीत, तर मित्र आहेत, हे शाहूचरित्र सांगते, 


              शाहू महाराजांचा सामाजिक सलोखा आपण कायम ठेवणे, हेच खरे शाहू प्रेम आहे. शाहू राजांची जयंती सणासारखी साजरी करा, असे डॉ. आंबेडकरांनी सांगितले आहे, त्यांच्या विचारांचे आपण आचरण करूया.


                                      

                                   - *डॉ. श्रीमंत कोकाटे*

                   

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖